Wednesday, 26 February 2025


                                             माय मराठी 


                                                विषय - मायबोली 


                                                        माय बोली माझी भाषा

                                                        अर्थ देते भावनांना,

                                                        तिच्या रहावे ऋणात

                                                        वाटते हो माझ्या मना.


                                                        माझी बोली भाषा

                                                       ओव्या,अभंगानी सजते,

                                                       भाव मनातील मांडता

                                                       मनोमनी ती रुजते.


                                                        माझ्या भाषेची गोडी

                                                        आहे अमृताहुन गोड

                                                        सहज भिडते मनाला

                                                        नाही कूणाला तोड


                                                        कधी होते ती कठोर

                                                        तापलेल्या लोहा परी,

                                                        कधी होते मृदू छान

                                                        मऊ मऊ लोण्या परी.


                                                        किती वर्णावी थोरवी

                                                        माझ्या बोली भाषेची,

                                                        दुर देशी पोहोचली

                                                        ओवी माझ्या  हो बोलीची.


                                                        कधी दरवळते सुगंधाने

                                                        पारिजातक फुलावानी,

                                                        नाही दुजा भाव तिला

                                                         बहरते ती  मनोमनी.




Monday, 3 February 2025

 संत पंचमी 


वसंत पंचमी |माघ शुद्ध मास|

जन्म दिन खास| शारदेचा|


देवी सरस्वती |वाक् विलासिनी|

आज जन्मदिनी |नमन हे||


विद्येची देवता |पुस्तक धारीणी| 

अज्ञान हरिणी |शारदा माॅ||


शुभ्र वस्त्र शोभे |तू वरदायीनी|

अभयदायीनी |सकलास|| 


वागीश्वरी तूच| तूच भगवती| 

वीणा घेई हाती |माता देवी||


कलेची देवता |तू सप्तसुरांची| 

मुर्ती चैतन्याची |पवित्र तू ||


देवी सरस्वती| देई वरदान |

साहित्याचे दान |आशिष हे||


ज्ञान पंचमीस| कलेचे हे दान|

खरे वरदान |जीवनात||


नमन तुजला |माता सरस्वती|

तुझी ग महती| अभंगात||


कृपा तुझी राहो| हेच ग मागणे|

भक्ती व श्रद्धेने |चरणाशी|| 


पुजते तुजला |मनोभावे माते|

चरणाशी होते |लीन सोनी ||

 माघ पंचमीला |जन्म तुकोबांचा|

क्षण आनंदाचा |सृष्टी वर ||


माय बाप किती |पहा भाग्यवान|

संताचा तो मान |पुत्रा मिळे||


विठ्ठलाची भक्ती |ओढ अंतरात |

विठ्ठल मुखात |सदोदीत||


वृक्ष वल्ली आम्हा |सगे नी सोयरे|

विधान हे खरे |जीवनात|| 


दिला उपदेश |भक्तीचा सोहळा|

भाव जरी भोळा |श्रद्धा मनी||


तुका म्हणे भक्ता |संसार करता|

भक्तीत रमता |हर्ष मनी||


तुकाराम गाथा |जीवनाचा सार|

मिळेल आधार |सकलास|| 


संत शिरोमणी |तुकाराम झाले|

वैकुंठास गेले |विमानात||


शब्दांची सुमने |वाहीली चरणीं|

आज ही अनुश्री| मनोभावे||

Saturday, 4 January 2025

*हरवला आहे ... "आनंद "*

मी पेपर उघडला,,!!
त्यात मीच दिलेली
जाहिरात होती...

*हरवला आहे ... "आनंद "*
पत्ता विसरण्याचा त्याला आहे छंद ...

रंग ... दिसेल तो
उंची ...भासेल ती

कपडे सुखाचे
बटण दुःखाचे...

कुणाला न सांगता घरातून गेला आहे निघून
थकलो आहोत सगळीकडे शोधून...

"आनंदा " परत ये,
कुणीही तुझ्यावर रागवणार नाही
तुझ्यावर कसलीही सक्ती करणार नाही...

घरातले सगळे आसुसून बघताहेत तुझी वाट
दार उघडं ठेवलंय वाढून ठेवलंय आशेचं ताट...

शोधून आणणाऱ्याला दिलं जाईल इनाम
मग म्हटलं आपणच करावं हे काम ...

*काय आश्चर्य ...*
 *सापडला की गुलाम ...*

जुन्या पुस्तकाआड,,
जुन्या गाण्याच्या अर्थाच्या पल्याड...

आठवणींच्या मोरपिसात,,
अगरबत्तीच्या मंद वासात...

हवेच्या थंडगार झुळूकेत ,,
लाटांच्या हळुवार स्पर्शात...

अवेळी येणाऱ्या पावसात,,
प्राण्यांच्या मखमली स्पर्शात ...

त्यानेच मारला पाठीत धप्पा,,
जुन्या मित्र मैत्रिणीशी मारताना गप्पा...

मी म्हटलं अरे , 
इथेच होतास ,
उगाच दिली मी जाहिरात
तो म्हणाला वेडी असता तुम्ही माणसं,
बाहेर शोधता .. .
मी असतो तुमच्याच मनात ... !


😊😊😊

Friday, 3 January 2025

क्रांती ज्योती सावित्रीबाई


क्रांती ज्योती सावित्रीबाई 
ओव्या 

पतीच्या साथीने माये,तूही खंबीर झालीस
वसा शिक्षणाचा घेऊन, ज्ञानाने पूढे पूढे गेलीस

माय माझ्या सावित्रीने, ज्ञान ज्योत पेटवली
तुझ्या महान कार्यांन ,मान स्त्रीची उंचावली

वसा शिक्षणाचा देऊन ,लढा दिला संघर्षाला
आळा घातला रुढींना ,क्रुर अशा त्या चालीला

दिली सात ज्योतीबाला, खंबीर अशी पाठीशी
भृणहत्या , बालविवाह बंद, एकनिष्ठ तत्वांशी

केले मोकळे आकाश, उंबरठ्यामधले मायीने
स्त्री जीवन झाले पावन, दिले पंख शिक्षणाने 

माये तुझ्या ऋणामधे, माय लेकी सा-या जणी
लीन तुझ्या चरणाशी, झालो सुखी समाधानी 

थोर उपकार माऊलीचे, न फिटणारे ऋण 
दिले पंखात बळ, अभिमान तुझा मनोमन

माझे ग नमन हे ,सावित्री तुझ्या चरणाशी
शिक्षणाचा तुझा वसा , एकनिष्ठ मी त्याशी

Tuesday, 6 August 2024

श्रावण

*श्रावण....🔸*

*तिन्ही सांजेला तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन लावून केलेल्या दिपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यांत मिसळलेले शुभंकरोतीचे सूर...  'दिव्याची आवस' म्हणून जाड कणिक केशरी गूळ वापरून केलेले खमंग दिवे आणि त्यावर मुक्तहस्ते घातलेलं रवाळ तूप... म्हणजेच येणाऱ्या श्रावणाची चाहूल .....!!*

*डबा भर चिरलेला पिवळा धम्मक गूळ, हरभरा डाळ, भाजलेले दाणे, फुटाणे, दाण्याचं खमंग कूट, नुकतीच करून ठेवलेली वेलचीची पुड, उपासाची भाजणी राजगिरा लाडू व खजूर यांनी भरलेले डबे, म्हणजेच श्रावणाच्या स्वागतासाठी सजलेलं घरातलं स्वयंपाकघर .....!!*

*जिवतीचा फोटो, कहाण्यांच पुस्तक, स्वच्छ घासून चमकणारं पळीपंचपात्र , दिव्यांनी सजलेलं देवघर, फुलपुडीतून डोकावणाऱ्या दुर्वा, आघाडा, फुलं आणि सगळी मरगळ झटकून सजलेेलं घर म्हणजेच श्रावणाचं आगमन .....!!*

*श्रावण म्हणजे आवर्जून करायचं पुरण, भाजणीचे वडे, नारळी भात, नारळाच्या वडया, वालाचं बिरडं, गव्हाची खीर, हारोळ्याचे लाडू, भोपळयाचे घारगे, गाकर, पुरणाची पोळी, पुरणाचे दिंड आणि दूध फुटाण्याचा नैवेद्य.. श्रावण म्हणजे वेगवेेगळ्या चवींतून घरांत दरवळणारा गंध .....!!*

*श्रावण म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाची राखी, आईने मुलांसाठी केलेली जिवतीची पूजा, शुक्रवारी मुलांच केलेलं पुरणाचं औक्षण, आपल्या घरासाठी सर्वांच्या आनंदासाठी केलेली देवीची पूजा, माहेरची येणारी आठवण म्हणून आई वहीनीकडे झालेलं सवाष्ण जेवण व मैत्रिणींबरोबर सजलेली मंगळागौर.. प्रत्येक नात्याला जपणारा हा श्रावण, अनेक रंगांची उधळण करत येणारा श्रावण .....!!*

*श्रावण म्हणजे गाभाऱ्यात उमटणारे ओंकार... श्रावण म्हणजे समईतल्या शुभ्र प्रकाशात दिसणारं पांढऱ्या फुलांनी सजलेलं शिवलिंग, कापसाच्या वस्त्रानं, हळदी कुंकवाच्या करंड्यानं धुप अगरबत्ती दिवा आणि चंदनाने सजलेलं पूजेचं ताट, गोकर्ण जाई जुई तगर जास्वंद बेल दुर्वा पत्री तुळस यांनी सजलेली पूजेची परडी. श्रावण म्हणजे प्राजक्ताच्या सडयाने नटलेलं आणि श्रावण सरींनी सजलेलं माझं आंगण..... !!*

*श्रावण म्हणजे हिरवा ऋतु... या सजलेल्या निसर्गाच्या बरोबरीने सजायचे दिवस.. कांकणांची किणकीण, काचेचा चुडा, हातावरची मेंदी, जरी काठाच्या साड्या, केसांत जुईचा गजरा, पायी जोडव्यांचा आवाज, गळ्यांत मंगळसूत्राबरोबर चमकणारा सर, कानांत कुड्या आणि पायांत पैंजण.. म्हणजेच घरातही भेटणारा, सजवणारा श्रावण..... !!*

*श्रावण म्हणजे आठवणींची सर...*

*श्रावण म्हणजे डोळे मिटतां केवड्याच्या पानाचा पसरलेला गंध तर कधी तिच्या चाहुलीने दरवळणारा सभोवताल.....*

*श्रावण म्हणजे नेमाने देवळांत जाणाऱ्या तिची आठवण करून देणारा सण, तर कधी मंगळागौर उजवताना तिला दिलेल्या वाणाची एक गोड आठवण.....*

*श्रावण म्हणजे शुक्रवारी न चुकता तिनं केलेलं औक्षण, माहेरवाशीण म्हणून भरलेली ओटी आणि तिने आग्रहानं खावू घातलेली पुरणाची मऊसूत पोळी.....*

*श्रावण म्हणजे देव्हाऱ्यांत समईच्या मंद प्रकाशात दिसणारं तिचं प्रसन्न रूप.....*

*श्रावण म्हणजे आई...*
 *तुझ्या आठवणींचा पाऊस .....!!!* 
 *काल पासून सुरू झालेल्या श्रावण*
 *मासाच्या सर्वांना शुभेच्छा🙏* 
 *आवडले म्हणून धाडले*

अनामिक

*अनामिक*......


ओठावरून अलगद लिपस्टिक फिरवली ! आणि मी आरशामध्ये पाहिलं .
 आज मला मुलींच्या कॉलेजला जायचं होतं. तेही फॅशन डिझाईनच्या कॉलेजमध्ये .
स्पर्धेच्या युगात अन फॅशनच्या जगात ! 
फॅशन , स्पर्धा अपरिहार्य आहे.याची पुसटशी जाणीव झाली. म्हणून मीही स्वतःलाच पुन्हा पुन्हा निरखून पाहिलं. आणि आज मला तर कॉलेज तरुणी सोबत संवाद साधायचा होता. त्यामुळे किमान थोडे तरी टापटिप असावे ! एवढाच माझा माफक उद्देश होता. त्यामुळे आरशात मी स्वतःला पुन्हा एकदा न्याहाळल. सर्व काही ओके आहे हा अंतर्मनाचा कौल मिळाला .
अरेच्चा ! 
उशीर होतोय मला.
लक्षात येताच भरभर आवराला सुरुवात केली. अकरा पर्यंत मला तिथे पोहोचायला हवं होत.
 पर्समध्ये आवश्यक ते सर्व काही आहे का, पुन्हा एकदा खात्री केली.
 आज नेमकं घरात कोणीच नव्हतं. त्यामुळे परत एक जबाबदारी जास्तीची.
 याचं लॉक , त्याचं लॉक !
पुन्हा तेच लावलेले लॉक ओढून पाहायचं !
कुठल्या राशीची ही लक्षण देव जाणे.माझ्याच राशीची बहुतेक असतील काय !
आहेतच.
 पुन्हा एकदा लावलेल कुलूप ओढून खात्री केली. आणि भरकन पर्स खांद्याला लटकवली.
 पुन्हा लक्षात आलं किचनमध्ये एकदा डोकावायच राहिलंच की !
मी पुन्हा किचनमध्ये परीक्षेच्या मॉडरेटर सारखी नजर फिरवली.
आणि तेवढ्या घाई गडबडीत सुद्धा समाधानाचा एक सुस्कारा सोडला. सगळं काही व्यवस्थित आवरून झालं होतं. सगळे लाइट्स ऑफ आहेत का पाहिलं. घाईगडबडीत आणि माझ्या धांदरटपणात काही राहायला नको म्हणून कायम मी दक्ष असते.
 विनाकारण आपल्या बाहेरच्या गोष्टीचा घरातल्या कुठल्याच गोष्टीवर परिणाम होणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी लागते.
 पुन्हा एकदा सगळं काही ओके असल्याची खात्री झाली. घराचं मुख्य दार बंद केल्यावर लक्षात आलं , पाण्याची भरलेली बॉटल घरात टेबलवरच विसरले.
हुश्श....
किती आवरा ,थोडी का होईना घाई गडबड होतेच .मग आता काय करायचं ? 
करायचं म्हणजे ,पुन्हा इतकी सगळी कुलप उघडायची अन लावायची !
छे ! छे ! नको यात वेळ घालवायला.
 आता मला कार्यक्रमासाठी दिलेल्या वेळेच बंधन पाळायला हवं .
 पुन्हा आज तर मी मुलींच्या महाविद्यालयात, मुलींना मार्गदर्शन करायला जाणार होते!
 गेस्ट म्हणून उशिरा जाऊन बॅड इम्प्रेशन पडणं बरं नाही ! मी मनालाच बजावलं. घराच्या मुख्य गेट जवळ आले तर काळे कुट्ट ढग जमा झाले होते. वातावरणात कमालीचा गारवा पसरला होता.जो मला घरात अज्जिबात जाणवला नव्हता. बरं झालं म्हणजे मला बाहेर गेल्यानंतर या गारव्यामुळे तहानच लागणार नाही तर ! या गोष्टीने मनाला दिलासा मिळाला.
 एवढ्यात टपोरी चार दोन थेंब थेट माझ्या गालाला भेटायला आली !
इश्श ! कधी नाही ते मी मेकअप केला होता त्यात लिपस्टिक सुद्धा !
  म्हटलं काय हा प्रकार ? आता कार्यक्रमाला उशीर होणारच. पण मला जायला हव होत . जवळ तर होतं ठिकाण .अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावर .
मी ते टपोरे थेंब झेलत गाडी जवळ आले. टपोऱ्या थेंबाने क्षणात रौद्ररूप धारण केलं. टप टप थेंबाची बरसात सुरू झाली.
 स्कुटी आहे तेथेच सोडून मी परत आले. म्हटलं हा पाऊस तर आहे ! जाईल पाच दहा मिनिटात .बाहेरच थांबुयात .उगाच घराचे आता कुलूप नको उघडायला. म्हणजे पाऊस उघडला की लगेच कार्यक्रमालाही लवकर जाता येईल .
क्षणात पाऊस अडवा तिडवा कोसळायला सुरू झाला. मला पोर्चमध्ये सुद्धा थांबण अशक्य झालं .लहान मुलांला आईने माराव तसा तो पाऊस माझ्या अंगावर धावून यायला लागला. म्हणजे आता तर मेकअप सोबत माझी साडी सुद्धा भिजणार !
 मी मागे फिरत पटकन कुलूप काढलं .लक्षात आलं पाण्याची विसरलेली बॉटल तरी आता यानिमित्ताने घ्यावी.
 मी किचनच दार उघडलं .टेबल वरची बॉटल घेतली .बाहेर निघणार तोच माझं लक्ष पुन्हा एकदा किचन कडे गेल।
 की मघाशी मंद गॅसवर दुधाचे पातेलं ठेवलं होतं. आणि तो गॅस तसाच चालू होता ! बापरे !क्षणात माझ्या हृदयाची धडधड एकदम वाढली. मी पुन्हा पुन्हा नजर फिरवून पण गॅसची ज्योत छोटी चालू आहे हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. दूध तापवण्याची ती वेळ ही नव्हती. पण मी दूध गॅसवर ठेवलं होतं .
धडधडत्या छातीने हॉलमध्ये आले .पाऊस पूर्णपणे थांबला होता .वातावरण पूर्ण स्वच्छ झाल होत. पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला.
 दोन तीनच मिनिट झाले असतील . धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे मला आत यावं लागलं.अवघ्या दोनच मिनिटात पाऊस ज्या वेगाने आला त्याच वेगात गायब सुद्धा !
 मी पुन्हा पुन्हा सर्व रूमवर नजर फिरवून दरवाजा बाहेरून बंद केला .माझं हृदय अजूनही धडधडत होत. गॅस चालू राहण्याची अक्षम्य चूक माझ्याकडून घडली होती. बारीक गॅस होता. घरी यायला चार पाच तास तर सहज लागले असते.दूध उतू गेलं असत ! गॅस विझला असता.आणखी काय काय झालं असतं ?
 या कल्पनेन पुन्हा धडकी भरली. बाहेर गाडी जवळ आले .गाडीवरचे पाणी पुसलं. तर जसं काही दोन मिनिटांपूर्वी जणू काही घडलच नाही.इतकं स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण झालं होतं .
 मघाच्या पेक्षा आता जास्त छातीत धडधडायला लागल. कारण कुठली तरी अनामिक शक्ती आपल्या पाठीमागे नक्की असते .याचा साक्षात्कार मला झाला होता. त्या शक्तीनेच मला खेचून घरात आणलं. निमित्त मात्र पावसाच केलं   
आणि होणाऱ्या अनर्थापासून वाचवलं होत. 
मी हात जोडले. माझे डोळे घळघळ वहात होते .
""""""""""''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''

                                             माय मराठी                                                              विषय - मायबोली          ...