Tuesday, 20 December 2022

संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन


आपल्या नावापेक्षा गाडगे बाबा आणि संत गाडगे महाराज या नावाने अधिक सुपरिचीत झालेले एक थोर समाजसुधारक म्हणुन आज देखील आदराने ज्यांचे नाव आपल्या ओठांवर येते ते संत गाडगे महाराजांचे.त्या काळी भारतीय ग्रामिण समाजात मोठया प्रमाणात त्यांच्या प्रयत्नांमुळे बदल घडुन आला. आज देखील अनेक राजकिय पक्ष आणि सामाजिक संस्था त्यांच्या केलेल्या कार्यातुन प्रेरणा घेत आहेत.गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्हयातील शेणगांव येथे अंजनगाव सुर्जी तालुक्यात एका परिट ( धोबी ) परिवारात झाला. गाडगे महाराजांचे बालपण मुर्तिजापुर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामांच्या गावी गेले. त्यांच्या मामांची खुप मोठी शेतजमीन होती. तेथे काम करायला विशेषतः गुरे राखायचे काम त्यांना फार आवडे.

गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. आपल्या मुलीच्या जन्मानंतर आप्तेष्टांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण दिले. हा त्या काळी केलेला फार मोठा बदला होता. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्याचिंध्यापासुन बनविलेला पोषाख असे पायी फिरणारे व्यक्तिमत्व गाडगे बाबा.

संपुर्ण दिवसभर गावातील स्वच्छता करावयाची, घाण साफ करायची आणि त्याबदल्यात चार घरी पोटापुरते अन्न मागायचे आणि रात्री लोकांच्या मनातील घाण साफ करण्याकरता किर्तन करायचं, त्यातुन समाज प्रबोधन करायचं, समाज कल्याणाचा प्रसार प्रचार करायचा. आपल्या किर्तनात ते संत कबीरांच्या दोहयांचा देखील उपयोग करत असत.

गाडगे बाबा ज्या ही गावात प्रवेश करत ते लगेच गावातील नाल्या आणि रस्ते स्वच्छ करत आणि स्वच्छता झाल्यानंतर गावक.यांना गांव स्वच्छ झाल्याबद्दल शुभेच्छा देखील देत.

सामाजिक प्रबोधनातुन लोकांच्या मनात ज्या अंधश्रध्दा घर करून बसलेल्या आहेत, ज्या अनिष्ट प्रथा, ( बोकड कापणे, कोंबडं कापुन देवाला वाहाणे) लोकांच्या मनातुन उदाहरण देऊन गाडगे बाबा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असत. गावकरी त्यांना गोळा करून पैसे देत त्याचा उपयोग गाडगे बाबा गावाच्या विकासाकरताच करत असत.

गावातुन मिळालेल्या पैश्यातुन गाडगे महाराजांनी अनेक शाळा, धर्मशाळा, रूग्णालयं आणि जनावरांकरता गोशाळा देखील उभारल्या. गाडगे महाराज जनतेला जनावरांवर होत असलेल्या अत्याचारापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न करत. समाजात चालत असलेल्या जातीभेद आणि वर्णभेदाला संपवण्याकरता त्यांनी खुप प्रयत्न केले.
समाजात दारूबंदी व्हावी याकरता सुध्दा बांबांनी बरेच प्रयत्न केले. गाडगे महाराज लोकांना कठोर परिश्रम, सामान्य राहाणीमान आणि परोपकार याला अंगिकारण्याचे धडे देत. महाराजांनी कित्येकदा मेहेर बाबांची भेट घेतली होती. मेहेर बाबांनी देखील गाडगे महाराजांना आपल्या आवडत्या संतामधील एक म्हंटले होते.
गाडगे महाराजांनी मेहेर बाबांना पंढरपुर येथे आमंत्रीत केले होते त्यावेळी 6 नोव्हेंबर 1954 ला हजारो लोकांनी मेहेर बाबा आणि गाडगे महाराजांचे एकत्र दर्शन घेतले होते.

महाराजांनी केलेली महत्वाची कार्य 
ग्रामस्वच्छता
अंधश्रध्दा निर्मृलन
जनजागृती
धर्मशाळा, गोशाळा, रूग्णालयं, शाळा, वसतीगृह यांची उभारणी
गाडगे महाराजांच्या कार्याचा गौरव 
संत गाडगे महाराजांच्या कार्याचा सन्मान करत महाराष्ट्र शासनाने 2000-01 मधे ’’संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची’’सुरूवात केली.
जे ग्रामस्थ आपल्या गावाला स्वच्छ ठेवतात त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
गाडगे महाराज महाराष्ट्रातील प्रसिध्द समाज सुधारकांमधील एक आहेत.
लोकांच्या समस्या त्यांना कळायच्या, गरीब आणि गरजवंतांकरता ते सतत कार्य करायचे. भारत सरकारने देखील त्यांच्या सन्मानार्थ अनेक पुरस्कार सुरू केले.
अमरावती विद्यापीठाचे नाव देखील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे. गाडगे महाराज भारतीय इतिहासातील एक महान संत होउन गेले. ते ख.या अर्थानी निष्काम कर्मयोगी होते. महाराष्ट्राच्या काना कोप.यांत त्यांनी अनेक धर्मशाळा, गोशाळा, विद्यालयं, चिकित्सालयं आणि वसतीगृहांची निर्मीती केली.
त्यांना मिळालेल्या दानातुन, देणग्यांमधुन त्यांनी या सर्व गोष्टींची उभारणी केली परंतु स्वतःकरता एक झोपडी देखील या महापुरूषाने बांधली नाही.
संत गाडगे महाराजांचा दशसुत्री संदेश 
भुकेलेल्यांना… अन्नं
तहानलेल्यांना… पाणी
उघडयानागडयांना… वस्त्रं
गरीब मुलामुलींना… शिक्षणाकरता मदत
बेघरांना… आसरा
अंध अपंग रोग्यांना… औषधोपचार
बेरोजगारांना…रोजगार
पशुं-पक्षी मुक्या प्राण्यांना… अभय
गरीब तरूण.तरूणींचे… लग्नं
गोरगरिबांना… शिक्षण

No comments:

Post a Comment

  Mahatma Jyotirao Phule was a prominent social reformer known for his advocacy of education and equality.  Here are some of his famous quot...