Tuesday, 22 July 2025

स्वयंपाक घरातील भांड्यांच्या गमतीजमती

स्वयंपाक घरातील भांड्यांच्या गमतीजमती

मी अगदीच लहान होते तेंव्हापासूनच भांड्यांशी खूप मैत्री झाली. भांड्यांच्या स्वयंपाक घरातील कामापासून ते त्यांनी केलेल्या इतरही कामां पर्यंतच्या अनेक गोष्टी कानावर पडायच्या. म्हणजे," ती तुमची अमकी आहे ना ती अमक्याची ' चमची 'आहे.
तो ना.. अमक्याचा ' चमचा ' आहे." वगैरे वगैरे..
अजूनच जास्त ढवळाढवळ करणाऱ्याला पळी म्हणायचे. पण मग पळीचं पुल्लिंग काय?
 अशा पद्धतीचे काम करणाऱ्या पुरुषाला काय म्हणाव?... पळा?
 एकदा आई कोणाला तरी सांगत होती. मी असली चमचेगिरी इथं खपवून घेणार नाही. पुन्हा चमचा! 
कढई आणि कपाला कान असतात. स्वयंपाक घरातील इतर भांड्यांची कुजबूज आणि आम्ही बायका स्वयंपाक घरात जी कुचकुच करायचो ती पण ते ऐकत असतील का?
 अनेक गोष्टी सासरी आल्यानंतर नव्याने कळल्या. तेल ठेवलेल्या भांड्याला कावळा म्हणतात हे मला माहीत नव्हतं .
पण त्या पहिल्याच दिवशी सासुबाई नी सांगितलं," पोळ्यांना कावळ्याचं तेल लाव ."
(शी शी किती घाणेरडे सासर... उलटी येते अगदी... )
सासुबाई दक्षता समितीवर होत्या. इतरही अनेक समित्यांवर पदाधिकारी होत्या. त्यामुळे अनेक प्रकारच्या माणसांशी त्यांचा संपर्क यायचा.
" तो गुंड गॅसवर ठेव."
 म्हणल्यानंतर गॅसकडे जाण्या ऐवजी मी अंगणात पळाले. रस्त्यातल्या गुंडाला उचलून डायरेक्ट गॅसवर ठेवण्याची कल्पना म्हणजे लय भारी.. अगदी भन्नाट. परंतु गुंड हे भांड्याचे नाव आहे. हे कळल्यावर माझी फारच निराशा झाली. तसंच ' शकुंतला ' भांड्या बद्दल. त्यात आम्ही दही लावत असू. 
"फ्रिज मधलं ते शकुंतला काढ."
 म्हणल्यावर नक्की काय करायचं तेच कळेना.
पाणी पिण्याच्या जगात सर्व जग सामावलेलं असतं का ?
माहित नाही. पाणी म्हणजे जीवन म्हणून त्याला जग म्हणत असतील का?
असू द्या...
 आता माझ्या जगात म्हणजे स्वयंपाक घरात जायची वेळ झाली. घरातल्यांच्या पोटात कावळे ओरडायला सुरू करतील. पुन्हा कावळे.. अरे देवा !

No comments:

Post a Comment

स्वयंपाक घरातील भांड्यांच्या गमतीजमती

स्वयंपाक घरातील भांड्यांच्या गमतीजमती मी अगदीच लहान होते तेंव्हापासूनच भांड्यांशी खूप मैत्री झाली. भांड्यांच्या स्वयंपाक घरातील कामापासून ते...