लगबग सणांची श्रावणाला भारी
माहेरच्या मुळासाठी आसावती पोरी
माहेरी रमते मी मैत्रिणींच्या मेळ्यात
उंच झोक्यासंगे चिंब भिजाव पावसात
लेकीला बघाया माय येडावलेली
सासरच क्षेम विचारते खूशाली
श्रावणाची माया नाही अंतरलेली
सासुरवशीणीची मन श्रावणाला भूललेली
श्रावणात पुजा मांडा महादेवाची
दुर्वा ,आगरडा पाने वाहा बेलाची
महादेवाची आवडती फुले धोतर्याची
महालक्ष्मीला मान पानं नागवेलीची
झिमझिम पाऊस झिम्मा फुगडीत रंगतो
हलक्या श्रावण धारानीं नभात खुलतो
पीसारा सुंदर मोरमनीचा थुईथुई नाचतो
वृक्ष वेलींना प्रेमान अलिंगण देतो
नटुनथटुन वारुळाला मांडता नागोबाची पुजा
फुगडी , फेर ,नाच गाण्याची झिम्मड मजा
चार दिवस तर पाठवले, ही वाटे मग सजा
घ्यायला यावं तर म्हणे मिळत नाही हो रजा!
अंगणात नव्या नवरींचीं गर्दी सजली
हिरवा चुडा , जरतारी साडी न् गालावर लाली
सारी रात सासरच्या हितगुजात मग जागली
हिरव्या पानांआड केशर कळी फुलली
येता श्रावण तनू माझी मोहरते
लाही सम कशी तडकन फूलते
पौर्णिमेचा नारळ ,राखी बांधते
बंधुच्या औक्षणात आऊक मागते
मनातलं जळमट मी काढून टाकते
झोका, मेंदी, राखी मनात आठवते
हसर्या छबीची हळुच कळीच खुलते
मग मीच एक धुंद श्रावण होऊन जाते
No comments:
Post a Comment