Friday, 14 July 2023

कुपी सुगंधाची


कुपी सुगंधाची 

सुगंधाची किमया औरच असते. सुगंधाची पहिली ओळख झाली ती पारिजातकाशी. लहानपणापासून अंगणी बहरलेला पारिजातक अंगावर मोतीपोवळे घेऊन उभा पाहिलेला. पहाटेला ही सुगंधाची कुपी भरभरून ओसंडत असे, आणि हा मोतीपवळ्यांचा सडा शेणाने शिंपलेल्या अंगणात पडे.ते टपोरे फुल रात्री उमले व सकाळी झाडावरून गंधासह ओघळून जमिनीवर एक गंधित सडा घाले.चार महिने चातुर्मासात कितीतरी शेजाऱ्यांनी गोपाळकृष्णाला या फुलांनी लाखोली वाहिली असेल. श्रावण मंगळागौरीचा महादेवाचा चौरंग या पारीजातकानेच सुशोभित होई. पारिजातक तर कमालीचा निरिच्छ वृक्ष. फारशी जोपासना न करता ही तो भरभरून देतो.आपल्या अंगाखांद्यावर हा सुगंधाची झुंबरचं बाळगतो म्हणाना. मोठा उदार वृक्ष. आपले सारे काही उधळून देणारे हे झाड. देणं हे असं पारिजातकासारखं असावं भरभरून देणारा हा वृक्ष.

जसजसे वय वाढत गेले तसतसे या झाडाफुलांनी, सुगंधानी वेडच लावले. पारिजातकाप्रमाणे दारची जाई, जुई, चमेली, मोगरा आपल्या मोहक, मादक सौंदर्याने आणि सुगंधाने मला वेडं करुन गेली. हाताच्या ओंजळीत ही पांढरीशुभ्र फुले घेऊन ती ओंजळ नाकाशी धरून हुंगत राहण्याचा जणू छंदच! फुले खाली ठेवून झाल्यावर ही रिकामी ओंजळ गंधाळून जाई.हे सामर्थ्य त्या शुभ्र वर्णी गंधित फुलांचं. असाच शुभ्र वर्ण घेऊन आलेलं दुसर गंधानी वेड लावणार फुल म्हणजे चाफा. पाच पाकळ्यांचं टपोरं फुलं. मधला भाग पिवळसर आणि धुंद करणारा मंद गंध. 
पिवळ्या रंगावरून आठवला पिवळाचाफा. व्वा!गंधांची कुपिच जणू! अलवार सौंदर्य व प्रेमात पडावा असा सुगंध. मनी न मावणारा आनंदच!

लहानपणापासून माझ्यातल्या फुलवेडीला या सुगंधाचे कोण आकर्षण! आपल्या गंधाने आकर्षित करणारा केवडा, रातराणी, मधुमालती, निशिगंध आणि हो बकुळ तर विचारूच नका! या सर्व फुलांचे आगळेवेगळे सौंदर्य व गंध रसिक मनाला भुरळ न घालेल तरच नवल! 
हा झाला फुलांचा गंध पण काही झाडंही गंधवेड पांघरून जन्माला येतात. मागच्याच आठवड्यात कढीपत्ता फुलला होता. एवढा फुलोरा आला की बस! येता जाता त्याच्या सुगंधाने क्षणभर झाडाजवळ थांबूनच पुढे सरकत असे. कडुलिंबाला सुद्धा फुलं आली की पाडव्याच्या वेळी मस्त सारे झाड गंधित होते. आंब्याच्या मोहराचं गंध तर विचारूच नका केंव्हाच त्यांनी आपल्या नाकाचा ताबा घेतलेला असतो. मला खूप नवल वाटतं या साऱ्या फुलणा-या गंधाळणाऱ्या झाडांचं. आपला सुगंध हातचं न राखता ती उधळून टाकतात.

 प्रेमी जीवाला या गंधाने आकर्षित केले नाही तर नवलच ! म्हणूनच तर...

 "गंध फुलांचा गेला सांगून' 
"तुझे नि माझे व्हावे मिलन"

 या निसर्गाच अस मानवी जीवनाशी, जगण्याची घट्ट नातं बरं का!

गुलाब, शेवंतीविषयी मी नाही लिहिलं तर ती माझ्यावर रुसतीलच! देशी गुलाबाचं सौंदर्य आणि त्याचा सुगंध असाच त्याच्या प्रेमात पडायला लावतो. तीच गोष्ट शेवंतीची.

 वृंदावनातली तुळशीबाई हाताच्या स्पर्शाने हलली तरी गंध पसरवते. तिचा सहवास तर नक्कीच हवा.
अरे हो, विसरलेच! परिपक्व झालेल्या फळांचा गंध तर मला क्षणोक्षणी बोलावतो. अढीतला आंबा पिकला आहे हे बघून नाही तर त्याच्या गंधाने लक्षात येतं.आधी गंध शोषला जातो आणि नंतर मधुर रसाने रसना तृप्त होते. या माझ्या बागेतल्या केशर आंब्याचे कौतुक त्याच्या रसरंगगंधाचे किती करू तेवढे थोडेच आहे. 
( एकदा याच चाखायला ) असच म्हणेन!
रसरंगगंधाच हे वैविध्य. एक दुसऱ्या सारखा नाही. खरंच तो किमयागार हे सारं घडवून आणतो. मनात जपलेली बकुळ समोर नसली तरी माझ्यापर्यंत गंध पोचवते. उंचचउंच आकाशाशी स्पर्धा करणारे बुचाचे फुल त्यांच्या सहवासाने शाळकरी वयात काही वर्षे लांब दांड्याची फुले वेचून तिपेडी वेणी गुंफण्यात व गंध हुंगण्यात गेली त्याला मी कसे विसरू? ही सारी "गंधमाया" माझ्या जगण्याचा अविभाज्य अंग आहे. या सार्‍या गंधकुप्या हृदयात जपून ठेवल्यात. त्याच मला ऊर्जा देतात प्रफुल्लित ठेवतात.

गंधवेड्या मनाला वैशाखात तप्त उन्हाने तापलेल्या धरणीवर पावसाचे थेंब पडून येणारा मृद्गंध असाच वेडावतो. त्याला मी पकडून ठेवते. अगदी आत पर्यंत श्वास घेऊन डोळे झाकून साठवून ठेवते. हा गंध जलधारा व धरतीच्या मिलनाचा.

 असाच एक गंध खेडेगावात मी अनुभवलेला तिन्हीसांजेला रानातून गुरे घरी येताना त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा नाद व पायांनी धूळ उडवीत जातात त्यालाही एक गंध असतो. गुरांच्या गोठ्यातला गंध तसाच त्यांच्या विश्वात सामावून ठेवणारा. मंदिराच्या गाभार्‍यातला गंध तर विचारूच नका! धुपदीप नैवैद्याने आणि साक्षात परमेश्वराच्या गळ्यातल्या सुगंधी फुलांनी भरून गेलेला गाभारा. आपल्या मनगाभाऱ्यालाही प्रसन्न ठेवतो. अशीही गंधांची दुनिया तिच्या मोहात पाडून आपल्याला सारे विसरायला लावते. 

निसर्ग, सकाळ-दुपार-संध्याकाळ यांचही गंधाशी नातं आहे. त्यांच्याशी जवळीक साधली तर नक्की ते उमजेल.

 कार्यालयातल्या कार्यक्रमांनाही गंध असतो बरं का! लग्नकार्यात कार्यक्रमाच्या गंधा बरोबरच मुदपाकखान्यातला गंध रसनेला तृप्त करतो. 
फार काय गंध प्रेमाला असतो, जगण्याला असतो, रागालोभाला, सुखदुःखाला, गरीब-श्रीमंतीला एक वेगळाच गंध असतो. 
एकूणच या गंधांच नातं जीवनाला वेढलेलं. पण मला नेहमीच खेचून घेणारा गंध तृप्तीचा,आनंदाचा.

नुकत्याच आंघोळ घालून, दुपट्यात गुंडाळून झोपवलेल्या बाळाने जांभई देत पाळण्यात आवाज करावा त्याच्या जवळपास गेलात तर त्याच्या जावळाचा, त्याच्या काजळाचा, तेलाने माखलेल्या अंगाचा जो गंध आहे त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. असा हा गंध नेहमीच मनाला आनंद देणारा.तसाच आईच्या पदराचाही.



4 comments:

  Mahatma Jyotirao Phule was a prominent social reformer known for his advocacy of education and equality.  Here are some of his famous quot...