Tuesday, 22 July 2025

स्वयंपाक घरातील भांड्यांच्या गमतीजमती

स्वयंपाक घरातील भांड्यांच्या गमतीजमती

मी अगदीच लहान होते तेंव्हापासूनच भांड्यांशी खूप मैत्री झाली. भांड्यांच्या स्वयंपाक घरातील कामापासून ते त्यांनी केलेल्या इतरही कामां पर्यंतच्या अनेक गोष्टी कानावर पडायच्या. म्हणजे," ती तुमची अमकी आहे ना ती अमक्याची ' चमची 'आहे.
तो ना.. अमक्याचा ' चमचा ' आहे." वगैरे वगैरे..
अजूनच जास्त ढवळाढवळ करणाऱ्याला पळी म्हणायचे. पण मग पळीचं पुल्लिंग काय?
 अशा पद्धतीचे काम करणाऱ्या पुरुषाला काय म्हणाव?... पळा?
 एकदा आई कोणाला तरी सांगत होती. मी असली चमचेगिरी इथं खपवून घेणार नाही. पुन्हा चमचा! 
कढई आणि कपाला कान असतात. स्वयंपाक घरातील इतर भांड्यांची कुजबूज आणि आम्ही बायका स्वयंपाक घरात जी कुचकुच करायचो ती पण ते ऐकत असतील का?
 अनेक गोष्टी सासरी आल्यानंतर नव्याने कळल्या. तेल ठेवलेल्या भांड्याला कावळा म्हणतात हे मला माहीत नव्हतं .
पण त्या पहिल्याच दिवशी सासुबाई नी सांगितलं," पोळ्यांना कावळ्याचं तेल लाव ."
(शी शी किती घाणेरडे सासर... उलटी येते अगदी... )
सासुबाई दक्षता समितीवर होत्या. इतरही अनेक समित्यांवर पदाधिकारी होत्या. त्यामुळे अनेक प्रकारच्या माणसांशी त्यांचा संपर्क यायचा.
" तो गुंड गॅसवर ठेव."
 म्हणल्यानंतर गॅसकडे जाण्या ऐवजी मी अंगणात पळाले. रस्त्यातल्या गुंडाला उचलून डायरेक्ट गॅसवर ठेवण्याची कल्पना म्हणजे लय भारी.. अगदी भन्नाट. परंतु गुंड हे भांड्याचे नाव आहे. हे कळल्यावर माझी फारच निराशा झाली. तसंच ' शकुंतला ' भांड्या बद्दल. त्यात आम्ही दही लावत असू. 
"फ्रिज मधलं ते शकुंतला काढ."
 म्हणल्यावर नक्की काय करायचं तेच कळेना.
पाणी पिण्याच्या जगात सर्व जग सामावलेलं असतं का ?
माहित नाही. पाणी म्हणजे जीवन म्हणून त्याला जग म्हणत असतील का?
असू द्या...
 आता माझ्या जगात म्हणजे स्वयंपाक घरात जायची वेळ झाली. घरातल्यांच्या पोटात कावळे ओरडायला सुरू करतील. पुन्हा कावळे.. अरे देवा !

 मराठी भाषा ही फारशी सोपी नाही.....!



*१. म्हणे "शिरा" खाल्ल्याने  "शिरा" आखडतात.


*२. "काढा" पिऊन मग एक झोप "काढा".


*३. "हार" झाली की "हार" मिळत नाही. 


*४. एक "खार" सारखी घरात येऊन नासधूस करते म्हणून तो तिच्यावर "खार" खाऊन आहे.


*५. "पळ" भर थांब, मग पळायचे तिथे "पळ".


*६. "पालक" सभेत शिक्षकांनी पाल्यांच्या आहारात  मेथी, "पालक" इ. पालेभाज्या ठेवण्याचा सल्ला दिला.


*७. "दर" वर्षी काय रे "दर" वाढवता...?


*८. "भाव" खाऊ नकोस, खराखरा "भाव" बोल.


*९. नारळाचा "चव" पिळून घेतला तर त्याला काही "चव" राहत नाही.


*१०. त्याने "सही" ची अगदी "सही सही" नक्कल केली.


*११. "वर" पक्षाची खोली "वर" आहे.


*१२. खोबर्‍यातला मुलांचा "वाटा" देऊन मग बाकीच्याची चटणी "वाटा".


*१३. "विधान" सभेतील मंत्र्यांचे "विधान" चांगलेच गाजले.


*१४. फाटलेला शर्ट "शिवत" नाही तोपर्यंत मी त्याला "शिवत" नाही.


*१५. भटजी म्हणाले, "करा" हातात घेऊन विधी सुरू "करा".


*१६. धार्मिक "विधी" करायला कोणताही "विधी" निषेध नसावा.


१७. अभियंता मला म्हणाला, इथे "बांध बांध".


*१८. उधळलेला "वळू" थबकला, मनात म्हणाला, इकडे "वळू" की तिकडे "वळू".


*१९. कामासाठी भिजवलेली "वाळू" उन्हाने "वाळू" लागली.


*२०. दरवर्षी नवा प्राणी "पाळत" मी निसर्गाशी बांधिलकी "पाळत" असतो.


*२१. फुलांच्या "माळा" केसांत "माळा".



मराठीची अवखळ वळणे...


*ज्यांना तोंडावर "बोलून टाकणं" जमत नाही ते पाठीमागे "टाकून बोलत"राहतात. 


*शहाणा माणूस "पाहून हसतो", निर्मळ माणूस "हसून पाहतो".


*काम सोपं असेल तर ते आपण "करून पाहतो", अवघड असेल तर "पाहून करतो".


*स्वयंस्फूर्त लेखक आणि उचलेगिरी करणारा उचल्या ह्यांच्यात फारसा फरक नसतो...


एकजण "लिहून बघतो" तर दुसरा "बघून लिहितो".


ही अशी सुंदर, लवचिक, अवखळ मराठी, नाही का? आता हेच बघा ना...

एखाद्याचा सत्कार करताना आपण देतो श्रीफळ, तर हकालपट्टी करताना देतो नारळ...!😊


Monday, 21 July 2025

 पसारा नवा रोज मांडीत आहे


सागर किनारी लाटांचा खेळ 

युगेन युगे कसा चालत आहे

कधी येई भरती ओहोटी कधी

शंख शिंपल्याच्या पाडून राशी

पसारा नवा रोज मांडीत आहे


पर्वतात जन्मास येऊन सरीता

भेटीची ओढ सागराच्या आहे

दरी ,घळई कुठे  धबधबा तर

विशाल त्रिभूज प्रदेशांचा भूवरी

पसारा नवा रोज मांडीत आहे


पौर्णीमेच्या रात्री आकाशी चंद्र

हळूवार मार्ग क्रमीत आहे

पुर्णत्वाने प्रकटून गगनी कसा

निळ्या आकाशी  चांदण्याचा 

पसारा नवा रोज मांडीत आहे


वाहतोय वारा असा अविश्रांत

कधी सोसाट्याचा कधी शांत आहे

पाऊसधारा तो घेऊन येतो

अन् चराचरात चैतन्याचा

पसारा नवा रोज मांडीत जातो

स्वयंपाक घरातील भांड्यांच्या गमतीजमती

स्वयंपाक घरातील भांड्यांच्या गमतीजमती मी अगदीच लहान होते तेंव्हापासूनच भांड्यांशी खूप मैत्री झाली. भांड्यांच्या स्वयंपाक घरातील कामापासून ते...